नांदेड, दि. २७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन फ्लॅश आऊट मोहिमेअंतर्गत अवैध वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई करत तब्बल ₹२५,२५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर पोलिसांनी आणखी एक मोठा आघात केला आहे.
दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ४.१५ वाजता स्वाद फॅमिली रेस्टॉरंट गार्डन समोर नांदेड ग्रामीण पोलिसांना संशयास्पद वाहनाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली. तपासादरम्यान टाटा कंपनीची एक हायवा गाडी (क्रमांक MH-46-BB-9546) सापडली. वाहनात अवैध वाहतूक चालू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ती गाडी जप्त केली असून वाहनाची किंमत अंदाजे ₹२५,००,००० इतकी आहे. तसेच या प्रकरणात आणखी ₹२५,००० रोख रक्कम जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण मुद्देमालाची किंमत ₹२५,२५,००० इतकी आहे.
या प्रकरणात आरोपीचे नाव साहेबराव चांदू गायकवाड (वय २७, व्यवसाय चालक, रा. आमदुरा ता. मुदखेड, जि. नांदेड) असे असून, त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०३(२), ४८७(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील,उपविभागीय अधिकारी इतवारा श्री. प्रशांत शिंदे तसेच पोलीस निरीक्षक (ग्रामीण) श्री ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या टीमने ही धडक कारवाई केली.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, “नांदेड ग्रामीण विभागात अवैध वाहतूक, गुन्हेगारी आणि बेकायदेशीर व्यवहारांविरोधात पोलिसांची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील.
या यशस्वी कारवाईमुळे नांदेड ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणले जाईल. ही कारवाई पोलिस दलाच्या दक्षता, तत्परता आणि जनसुरक्षेच्या वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.












