नायगाव (ता. नायगाव, जि. नांदेड) – माननीय आमदार राजेश पवार यांनी आज पंचायत समिती नायगावच्या बांधकाम विभागाला अचानक भेट देत घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या हप्त्यांच्या व्यवहाराची चौकशी केली. या भेटीदरम्यान एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
चौकशीत असे स्पष्ट झाले की, बांधकाम विभागातील संबंधित अभियंता (इंजिनिअर) हा नायगाव तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांकडून घरकुल मंजुरीसाठी किंवा हप्ते टाकण्यासाठी 500 ते 1000 रुपयांची लाच मागत असल्याचे आरोप समोर आले आहेत. अनेक लाभार्थ्यांनी याबाबत आमदारांसमोर तक्रारी मांडल्या असून, काहींनी तर लाच देण्याचेही कबूल केले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार पवार यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“गोरगरिबांच्या नावावर शासनाच्या योजनांचा गैरवापर करणे असह्य आहे. गरीबांना मदत करायची की लुबाडायचं? हे आम्ही सहन करणार नाही.”
स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या या पावलाचे स्वागत केले असून, पंचायत समितीतील लाचखोरीच्या प्रकारावर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे नायगाव तालुक्यात प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.












