अहिल्यानगर (दि. २८ सप्टेंबर) :
प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथे एसीबी छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने यशस्वी सापळा रचून मोटार वाहन निरीक्षक व एका खाजगी दलालाला लाच प्रकरणी रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार यांनी दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथे समक्ष येऊन भेट दिली असता, तेथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गीता शेजवळ व त्यांचा खाजगी साथीदार इस्माईल पठाण यांनी “ओव्हरलोड गाडी” त्यांच्या हद्दीतून चालविण्यासाठी पैशाची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे दि. २४ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली.
एसीबीने तक्रारीची पडताळणी करताना शासकीय पंचांच्या उपस्थितीत तपास केला असता, गीता शेजवळ व दलाल इस्माईल पठाण यांनी तक्रारदाराकडे ३,००० रुपयांची लाच मागणी केल्याचे सत्यतेने निष्पन्न झाले.
यानंतर एसीबी पथकाने त्वरित सापळा रचला. दि. २४ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथे चांदणी चौक परिसरात झालेल्या या कारवाईत इस्माईल पठाण याने गीता शेजवळ यांच्या सांगण्यानुसार तक्रारदाराकडून ३,००० रुपये शासकीय पंचांच्या उपस्थितीत स्वीकारले. त्याच क्षणी एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले.
घटनास्थळी घेतलेल्या अंगझडतीत आरोपी इस्माईल पठाण याच्या ताब्यातून जिओ कंपनीचा मोबाईल व रोख ५०० रुपये जप्त करण्यात आले. या लाच प्रकरणात मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याने त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर गीता शेजवळ व इस्माईल पठाण यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक, एसीबी छत्रपती संभाजीनगर राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा सहाय्यक अधिकारी संतोष तिगोटे, पोलीस निरीक्षक, एसीबी छत्रपती संभाजीनगर यांच्यासह पोहेकॉन्स्टेबल राजेंद्र सीनकर, पो.अंमलदार दीपक इंगळे, प्रकाश घुगरे व सी.एन. बागुल यांनी केली.












