नांदेड, दि. २७ सप्टेंबर २०२५ :
गेल्या २४ तासांत नांदेड जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील सर्व नाले व नदीपात्रे तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषत: बिभीषणपूर येथे गोदावरी नदीची पाणी पातळी ३५८.१० मीटरपर्यंत पोहोचली असून ही पातळी धोक्याच्या वर गेली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विविध उपाययोजना सुचवल्या आहेत.
नागरिकांनी करावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना :
१) पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यास आवश्यक साहित्य, धान्य, किमती वस्तू, कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
२) गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तालुका प्रशासनाला कळवावे.
३) वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायाने वापरण्यासाठी दिवा, टॉर्च, बॅटरी आदी वस्तू जवळ ठेवाव्यात.
४) धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे. विशेषत: नाले, तळी, नदीकाठी जाणे बंद करावे.
५) प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
६) गुरेढोरे व इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
७) आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तात्काळ स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा.
काय करू नये :
१) पूरग्रस्त भागात, नद्यांच्या पुलांवर विनाकारण भटकू नये.
२) पाण्यातून चुकीच्या पद्धतीने जाऊ नये, तसेच प्रशासनाने दिल्याशिवाय पूल ओलांडू नये.
३) वीज तारा व खांबांच्या संपर्कात येऊ नये.
४) लहान मुलांना जलाशय, नदीपात्र, नाले यांच्याजवळ पाठवू नये.
५) मृत प्राण्यांचे किंवा असुरक्षित वस्तूंचे पाणी पिऊ नये.
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी नागरिकांना प्रशासनाशी समन्वय साधून स्वतःची व कुटुंबियांची सुरक्षितता राखण्याचे आवाहन केले आहे.
👉 प्रशासनाकडून नागरिकांना विशेष विनंती करण्यात आली आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.












