नांदेड दि. 2 ऑक्टोबर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत नांदेड तालुक्यातील कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीला स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती. मात्र, त्या विहिरीवरील सोलार व सिंचन साहित्य मंजूर करण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी( हदगाव पंचायत समिती) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर पडताळणी करण्यात आली व 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता नांदेड शहरातील चेतन नगर, नंदी हॉटेल येथे सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी कृषी विस्तार अधिकारी यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.












