📰
नांदेड, दि. २९ सप्टेंबर –(प्रतिनिधी)
कौठा परिसरातील “शगून सिटी” या गृहप्रकल्पाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचण्याची समस्या तीव्र होत असून, यंदाही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे विजेच्या DP ला पाणी लागण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की, संबंधित डेव्हलपरने आकर्षक जाहिराती करून घर खरेदीस प्रवृत्त केले; मात्र प्रकल्पात मूलभूत सोयी-सुविधांची योग्य व्यवस्था नाही. नागरिक म्हणत आहेत की, “शगून सिटी” हा बोगस प्रकल्प असून शिक्षित लोकसुद्धा यामध्ये फसले आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, नगरपरिषदेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अशा प्रकारचे प्रकल्प उभे राहत आहेत आणि सामान्य लोकांची फसवणूक केली जात आहे. जर कोणतीही दुर्घटना झाली तर त्याला डेव्हलपर व संबंधित जबाबदार अधिकारी उत्तरदायी असतील, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
👉 नागरिकांना आवाहन :
“घर किंवा प्लॉट खरेदी करताना त्याची सखोल चौकशी करा. फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालू नका.”












