नांदेड, दि. 29 सप्टेंबर :-(प्रतिनिधी)
जिल्ह्यात ऑगस्ट 2025 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी शासनामार्फत मंजूर करण्यात आलेल्या मदत निधीच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नांदेड जिल्ह्यात तब्बल 7 लाख 74 हजार 313 शेतकऱ्यांच्या 6,48,533.21 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शासनास 553.34 कोटी रुपयांच्या मदत निधीची मागणी केली होती. शासनाने त्यानुसार 18 सप्टेंबर 2025 रोजी हा निधी मंजूर केला आहे.
या मंजूर निधीपैकी आतापर्यंत 3 लाख 10 हजार 126 शेतकऱ्यांच्या खात्यात 230 कोटी 46 लाख रुपये वाटपासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीतून तहसील कार्यालयांमार्फत नोंदविण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांचे V.K. नंबर तलाठी मार्फत गावागावात जाहीर करण्यात आले असून, या नंबरच्या आधारे शेतकऱ्यांनी सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण केल्यास त्यांचे मदतीचे पैसे थेट त्यांच्या खात्यावर डिबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केले जातील.
उर्वरीत बाधित शेतकऱ्यांची माहिती पुढील 4 ते 5 दिवसांत प्रणालीत नोंदविण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
👉 थोडक्यात :
- 7.74 लाख शेतकऱ्यांचे 6.48 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
- 553.34 कोटींच्या मदतीची शासनाकडे मागणी
- 18 सप्टेंबरला निधी मंजूर
- आतापर्यंत 3.10 लाख शेतकऱ्यांना 230.46 कोटींचे वाटप प्रक्रियेत
- ई-केवायसी पूर्ण करणाऱ्यांना डिबीटीद्वारे थेट खात्यात मदत
शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू केंद्रावर ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी – (जिल्हाधिकारी) राहुल कर्डिले












