नांदेड, दि. २९ सप्टेंबर :- नांदेड तालुक्यातील राहेगाव या गावाचा पुलावर आलेल्या पाण्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून संपर्क तुटला होता. या परिस्थितीत एसडीआरएफच्या साहाय्याने महसूल विभागाने तातडीने गावात विद्युतपुरवठा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. या मदतकार्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दि. २८ सप्टेंबर रोजी आमदार आनंदराव बोंढारकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत कार्य पार पडले. तहसीलदार वारकड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीआरएफ पथकाचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे यांच्याशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या.
एसडीआरएफच्या बोटींच्या साह्याने विद्युत विभाग व वैद्यकीय पथक राहेगावात पोहोचले. महावितरणचे सहाय्यक अभियंता पी.पी. साखरे, वरिष्ठ तंत्रज्ञ तिरमले, पतंगे यांनी तीन दिवसांपासून बंद असलेला विद्युतपुरवठा सुरळीत केला. वैद्यकीय पथकाने १०२ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. यामध्ये डॉ. विवेक पदमने, डॉ. शेख हसन, आरोग्य सेविका शेख मुमताज, आरोग्य सेवक शैलेश वाघमारे व बाळू घोडजकर यांनी योगदान दिले.
या मोहिमेत वाजेगाव व तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी गौतम पांढरे, राहेगावचे सरपंच विलास पाटील इंगळे, पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे, किकीचे पोलीस पाटील गोविंद तेलंगे तसेच आशाताई सुमित्रा इंगळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
गावात पुन्हा वीज व आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला आहे. 🙏












