नांदेड, दि. 17 सप्टेंबर :- थकीत पिककर्जदारसाठी तसेच शेतीविषयक इतर कर्जदारासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्यावतीने शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर केली आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्यावरील थकीत कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे जिल्हा समन्वयक तथा क्षेत्रीय व्यवस्थापक व जिल्हा उपनिबंधक नांदेड सहकारी संस्था यांनी संयुक्तपणे केले आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध भागात आलेला ओला किंवा कोरडा दुष्काळ, कोविड महामारी तसेच काही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे बँकेचे बरेचसे शेतकरी थकीत झाले असून त्यांची आर्थिकपत खालावली आहे. आपल्या जिल्ह्यात या कारणास्तव शेतकरी त्यांच्या पीक कर्ज नूतनीकरण करण्यात तसेच शेतीविषयक इतर कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरत आहेत.
शेतकरी नवसंजीवनी योजनेअंतर्गत सर्व थकीत पीककर्जधारकांना संपुर्ण व्याज माफी ही योजना बँकेने तयार केली असून शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. शेतकरी समाधान या योजनेअंतर्गत पुर्ण व्याजमाफी व काही प्रमाणात मुद्दल माफ करून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्याची योजना बँकेनी आणलेली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.











