नांदेड, दि. ३० सप्टेंबर :
सकल मातंग समाजाच्या वतीने न्या. अनंत बदर समितीला देण्यात आलेल्या अनावश्यक मुदतवाढीचा तीव्र निषेध करून ती तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अनु. जाती आरक्षणाचे अ.ब.क.ड वर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावे आणि तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व नोकर भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.
या मागण्यांसाठी प्रा. देवीदास इंगळे सर यांनी साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, सकल मातंग समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनही छेडण्यात आले आहे.
उपोषण स्थळी विविध मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यात लोकनेते, आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, समाजभूषण डॉ. उत्तमराव सोनकांबळे (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश), सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मारोती वाडेकर, सतीशजी कावडे (संस्थापक अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य), विजय वरवंटकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर), गणेशजी तादलापूरकर, जी. एल. सूर्यवंशी (यशवंत महाविद्यालय नांदेड), मोहसीन खान पठाण (शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड), तसेच बंटी इंगळे पाटील (शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक) आदींचा समावेश आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत हे उपोषण व धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे.












