नांदेड दि. 22 सप्टेंबर : नांदेड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाणे, वज्रनाभ चौकी तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एक मोठी कामगिरी करत मंदिर चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद केली आहे. या प्रकरणात एकूण ५ गुन्हे उघडकीस आले असून तब्बल १,५६,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पकडलेले आरोपी :
- रवीकांत किशोर नरवडे (वय 28, रा. वाटेगाव ता. हदगाव ह.मु.समतानगर अर्धापूर)
- ज्ञानेश्वर उत्तमराव जाधव (वय 28, रा. वाटेगाव ता. हदगाव जि. नांदेड)
जप्त मुद्देमाल :
- विविध मंदिरांमधून चोरलेली पितळी/कांस्य देवतांच्या मूर्ती व सोन्याचे दागिने – ७५,००० रुपये
- नाणी – ११,१०० रुपये
- एक मोटारसायकल – ७०,००० रुपये
एकूण मुद्देमाल – १,५६,१०० रुपये
गुन्हे :
आरोपींविरुद्ध शिवाजी नगर, वजिराबाद, मुदखेड, मनवथ व हदगाव पोलीस ठाण्यांत विविध कलमान्वये पाच गुन्हे दाखल असून त्यात घरफोडी, चोरी व मारामारीचे गुन्हे समाविष्ट आहेत.
कारवाईमागचे मार्गदर्शन :
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही धाडसी कारवाई केली.
घटनेची पार्श्वभूमी :
दि. 14.09.2025 रोजी शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठल मंदिरात अज्ञात व्यक्तींनी ४००-५०० वर्षे जुनी पितळी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती व सोन्याचे दागिने चोरले होते. घटनेनंतर विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
या कारवाईमुळे मंदिर चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आले असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
– प्रतिनिधी












