नांदेड, दि. २८ सप्टेंबर :-
ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ महिन्यातील भीषण पुरामुळे नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला मदतीचे आवाहन केले होते.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महसूल विभागातील महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटना (जिल्हा नांदेड), महाराष्ट्र राज्य तलाठी संघ (राज्यस्तरावरून) तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना (जिल्हा) यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपला एक दिवसाचा वेतन शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच जिल्हा परिषद, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून आपला एक दिवसाचा वेतन देण्याचे ठरवले आहे.
या माध्यमातून जमा होणारा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार असून, त्यातून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसन व मदतीसाठी उपयोग केला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.
👉 प्रशासन व कर्मचारी वर्गाचा हा पुढाकार पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार आहे.












