नांदेड, दि. २८ सप्टेंबर :
नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रासह सखल भागांमध्ये पाणी शिरले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीत महापालिका प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून आतापर्यंत एकूण ९७० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आज (दि. २८ सप्टेंबर) विविध पुरग्रस्त भागांसह महापालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नागरिकांची विचारपूस करून आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
अग्निशमन दलाचे धाडसी कार्य
शोध व बचाव मोहिमेत महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी के. जी. दासरे व त्यांच्या टीमने विशेष धाडस दाखवत पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.
निवारा केंद्रातील सोयीसुविधा
महापालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये नागरिकांसाठी जेवण, पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य तपासणी, औषधोपचार, तसेच स्वच्छता आणि फवारणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आयुक्तांनी या सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून कोणतीही कमतरता राहू नये याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आयुक्तांचा दौरा
आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी एनटीसी मिल एरिया, पाकीजा फंक्शन हॉल, लिबर्टी फंक्शन हॉल व नंदगिरी किल्ला या निवारा केंद्रांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी महापालिकेतर्फे मिळणाऱ्या मदतीबाबत समाधान व्यक्त केले.
महत्त्वाचे आवाहन
पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्तांनी सांगितले की, नदीने इशारा पातळी ३५१ मीटर ओलांडून सध्या ३५४.८९ मीटर पातळी गाठली आहे. ही स्थिती पुढील २४ तास कायम राहण्याची शक्यता असल्याने नदीलगतच्या नागरिकांनी तातडीने निवारा केंद्रात स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच नागरिकांनी घाबरून न जाता मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती शाखेला किंवा जवळच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












