नांदेड, दि. 26 ऑक्टोबर 2025 :-
नांदेड जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या धंद्यावर अंकुश आणण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी “मास रेड” (Mass Raid) मोहीम राबवून अवैध दारूविरोधात व्यापक कारवाई केली आहे.
पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत विविध ठिकाणी छापे टाकून एकूण ४९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १,६९,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत करण्यात आली असून नांदेड जिल्ह्यातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
या मोहीमेत अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, भोकऱ येथील उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून अवैध दारूच्या उत्पादन केंद्रांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात दारू, हातभट्टी उपकरणे व तयार माल जप्त करण्यात आला.
नांदेड पोलिसांची ही मोहीम जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरोधातील धडक कारवाईचे उत्तम उदाहरण ठरत असून पोलिस दलाने आगामी काळात अशा कारवाया अधिक कठोरपणे सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.












