नांदेड 29 सप्टेंबर (प्रतिनिधी)
भोकर मतदारसंघातील पाळज गटातील पाळज गावाने मागील निवडणुकीत तब्बल ८० टक्के मतदान आमदार श्रिजया चव्हाण यांना दिले होते. मात्र गावकऱ्यांच्या मते, आज महापुरामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आमदारांनी साधी विचारपूस देखील केली नसल्याची नाराजी ग्रामस्थांमध्ये आहे.
महापुराच्या पाण्यात गावातील लक्ष्मीनारायण पुस्पूरवाड हे वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह आज महागाव परिसरात सापडला. ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक शेतकरी व नागरिक प्रशासनाला सातत्याने निवेदन देत आहेत की नदीवर पूल बांधण्यात यावा. मात्र तो विषय अद्यापही केवळ कागदावरच आहे. “जर पूल झाला असता तर आज लक्ष्मीनारायण यांचा जीव वाचला असता,” असा सूर ग्रामस्थांमध्ये उमटत आहे.
आता तरी ही शोकांतिका लक्षात घेऊन संबंधित नदीवर तातडीने पूल बांधण्यात यावा, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील, अशी कळकळीची विनंती ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने आमदार मॅडम यांच्याकडे केली आहे.












