📰
नांदेड, दि. २९ सप्टेंबर :-
माहिती अधिकार अधिनियम 2005 चा व्यापक प्रसार व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 28 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने, शासन निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. 29 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत माहिती अधिकार कायदा अभ्यासक व अधिवक्ता डॉ. भीमराव हाटकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रतिपादनात सांगितले की, “माहिती अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, अर्जांची कार्यवाही अधिकारी व कर्मचारी यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता व तत्परतेने करणे आवश्यक आहे.” त्यांनी माहिती अधिकार कायद्याची निर्मिती, वेळोवेळी झालेल्या दुरुस्त्या तसेच या कायद्यामुळे समाजमन व प्रशासकीय घटकांच्या मानसिकतेत झालेले बदल याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेनंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, तहसीलदार शंकर लाड, तहसीलदार विकास बिरादार, नायब तहसीलदार जया अन्नमवार, विधी अधिकारी आनंद माळाकोळीकर यांच्यासह विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 माहिती अधिकार दिनानिमित्त अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढीस लागून पारदर्शक व जबाबदार प्रशासनाला चालना मिळते, असा सूर यावेळी उमटला.












