नांदेड, दि. 10 ऑक्टोबर :
पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्हा गु.र.नं. 448/2021 कलम 354(ड), 504, 506 भादंवि सह कलम 8,12 पोक्सो अंतर्गत नोंदविण्यात आला होता. तपास अधिकारी श्रीमती ए. एस. पाटील यांनी साक्षीदार पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडचे न्यायमूर्ती श्री. सुनील ज. वेदपाठक यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस दोन वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. पी. डी. बुलबुले यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. मार्गदर्शन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांचे होते. प्रकरणातील तपास अधिकारी तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.












