नांदेड (28 सप्टेंबर) – नांदेड शहरातील वजीराबाद परिसरात मोलकरणीनेच घरातील कपाटातून तब्बल सहा लाख रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली असून, वजीराबाद पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
फिर्यादी व गुन्ह्याची माहिती
फिर्यादी अमन पी. महेंद्र जैन (वय 31 वर्ष, व्यवसाय – व्यापार, रा. बोरबन फॅक्टरी, वजीराबाद, नांदेड) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 5 वाजता ते 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या दरम्यान त्यांच्या बोरबन फॅक्टरीतील राहत्या घरातील बेडरूममधील कपाटातील कॅरीबॅगमध्ये ठेवलेले सहा लाख रुपये चोरीस गेले.
फिर्यादींना संशय होता की घरात काम करणारी मोलकरीण किंवा अज्ञात चोरट्याने ही रक्कम चोरली आहे.
पोलिसांची तपासणी व आरोपी कबुली
तक्रार प्राप्त होताच वजीराबाद गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. या तपासात उज्ज्वला संतोष सरोदे (वय 34 वर्ष, व्यवसाय) – मोलकरीण, रा. नवीन हसापूर, नांदेड) हिला विश्वासात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी तिच्याकडून एकूण सहा लाख रुपये जप्त केले असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांचा समन्वयित प्रयत्न
या कारवाईत पोलीस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रामेश्वर वेजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस ठाण्याचे पो.नि. राजू वटाणे, सहा. पो.नि. चिमा बोयने तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार – कॉ. शिवसाब मडपती, हबीब चाऊस, दिगंबर मुसळे, ज्वालासिंग बावरी, विलास कदम, गणेश धुमाळ, संतोष पोकले रमेश सूर्यवंशी यांनी विशेष योगदान दिले.
पोलीस अधीक्षकांचा गौरव
शहरात वाढलेल्या चोरी स्नॅचिंग, घरफोडी, चोरी, दरोडा यांसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत या कारवाईने यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांनी गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे.
👉 सहा लाखांचा गंडा घालणारी मोलकरीण अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली असून नागरिकांनी घरगुती मदतनीस ठेवताना सावधानता बाळगावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.












