नांदेड, दि.२९ सप्टेंबर :–
सततच्या मुसळधार पावसाने आणि भीषण पुरामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरांची भिंत खचली, चूल विझली, शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र या संकटसमयी शेतकरी आपल्या अढळ आत्मविश्वासाने उभा राहताना दिसतो आहे.
आजची परिस्थिती पाहून अनेकांना कुसुमाग्रजांची सुप्रसिद्ध कविता “कणा” आठवली. पावसात भिजलेल्या, चिखलाने माखलेल्या कपड्यांसह हसतमुखाने उभा असलेला शेतकरी जणू या कवितेतूनच बाहेर पडल्यासारखा भासत होता. घर उद्ध्वस्त झाले तरी “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा” या भावनेने तो पुन्हा भिंत बांधण्यास, चिखल काढण्यास, आणि नव्याने जगण्याची तयारी करत आहे.
सरकारकडून मदत मिळेल, शासकीय यंत्रणा कार्यरत आहे; तरी शेतकऱ्याचा हा आत्मविश्वास, कणखरपणा आणि लढण्याची जिद्द यामुळेच तो खऱ्या अर्थाने आशेचा किरण बनला आहे.
पूराने संसार उद्ध्वस्त केला असला, तरी शेतकऱ्याचा ‘कणा’ आजही ताठ उभा आहे..! 🌾🙏












