नांदेड, दि. 26 ऑक्टोबर 2025 :
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड पोलिसांनी ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत विशेष मोहिम राबवून धडक कारवाई केली.
या कारवाईत शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कलम 110/117 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
या मोहिमेत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, तसेच शहर पोलीस उपविभाग प्रमुख भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वात शहर व ग्रामीण भागात ही कारवाई करण्यात आली.
🚔 पोलिस स्टेशन भाग्यनगर
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी 03 इसमांवर कारवाई केली. हे सर्व इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करत असल्याचे आढळून आले. त्यांच्या विरोधात कलम 110/117 नुसार गुन्हे नोंदवण्यात आले.
सदर व्यक्ती हॉटेल, बार, दारू दुकानांच्या परिसरात आढळल्या.
🚓 पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण
ग्रामीण विभागात चालविलेल्या मोहिमेत बाभुळगाव, गोपालचावाडी, येथील 04 इसमांवर कारवाई करण्यात आली. हे सर्वजण सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळले. त्यांच्याविरोधातही कलम 110/117 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
🚨 पोलिस स्टेशन इतवारा
इटवारा पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान जुन्या मोहन येथे 01 इसमाला दारू पिताना पकडले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 75(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
🛑 दामिनी पथकाची कारवाई
दामिनी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पेट्रोलिंग दरम्यान विश्रांतिगृह गार्डन परिसर, स्टेट बँक जवळ, इतवारा व शिवाजीनगर भागात 03 इसमांना सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना पकडले. त्यांच्याविरोधातही आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली.
⚠️ पोलिस अधीक्षकांचा इशारा
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले की,
“नांदेड शहरात कोणालाही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास परवानगी दिली जाणार नाही. अशा प्रकारे शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.”
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पित असल्याचे दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.












