३० ऑक्टोंबर नांदेड (प्रतिनिधी) – माधव वाघमारे अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अवघ्या २४ तासांच्या आत आपल्या बेडीत ओढून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
ही कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, तसेच मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईचे नेतृत्व श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक (स्थानीय गुन्हे शाखा नांदेड) आणि पोलीस उपनिरीक्षक साईनाथ डोळे यांनी केले. त्यांच्या पथकात कॉन्स्टेबल मिलिंद नरबाग, प्रमोद जोंधळे, इब्राहिम शेख, संदीप घोगरे, बालाजी कदम, अमोल घेवारे, संतोष बेल्लूरोड, महेश बडगु तसेच सायबर सेलचे हेड कॉन्स्टेबल राजू सिटीकर व दीपक ओढणे यांचा समावेश होता.
कांडली बु (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील नकुल संजय पावडे (वय १७ वर्षे) हा शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मामाकडे राहत होता. तो दिवाळी सणानिमित्त १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या गावी आला होता. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता वडिलांनी उठून पाहिले असता मुलगा घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात आले.
शोध घेतला असता काहीही सुगावा न लागल्याने फिर्यादी संजय पावडे यांनी पोलीस ठाणे तामसा येथे तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा क्रमांक १९१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी mishan baray अंतर्गत या घटनेचा तपास तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने कार्यरत झाले. कांडळी परिसरात सखोल गुप्त तपास सुरू असताना बातमीदाराकडून माहिती मिळाली की विशाल गणेश दारेवाड (वय १९, शेती व्यवसाय) हा नकुलचा मित्र असून, त्यानेच खुनाचा कट रचल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली की, नकुल हा त्याच्या बहिणीस सतत त्रास देत होता, त्यामुळे रागातून त्याने वडील गणेश संभाजी दारेवाड (वय ३९) यांच्यासोबत मिळून २६ ऑक्टोबर रोजी रात्री १.३० ते ३ वाजताच्या दरम्यान नकुलला बोलावून घेतले, त्याला मारहाण करून ठार मारले आणि पुरावे नष्ट केले.
यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्याची संपूर्ण कबुली घेतली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. नरवटे करीत आहेत.
सदर गंभीर गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणून स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कुशल तपासाचे प्रदर्शन केले आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी पथकाचे विशेष कौतुक करून त्यांना अभिनंदन दिले आहे.
आरोपी
गणेश संभाजी दारेवाड (वय ३९, व्यवसाय – शेती, रा. कांडली बु, ता. हिमायतनगर)
विशाल गणेश दारेवाड (वय १९, व्यवसाय – शेती, रा. कांडली बु, ता. हिमायतनगर)












