नांदेड, दि. ३ नोव्हेंबर २०२५ (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आणि शांततेचा भंग करणाऱ्या इसमांवर “सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाने” आज मोठी धडक कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नांदेड शहरातील प्रमुख भागात – भाग्यनगर, नांदेड ग्रामीण, इतवारा, विमानतळ परिसर आणि वजिराबाद या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी २ व ३ नोव्हेंबर रोजी केलेल्या या तपासणीत, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून शिस्तीचा बडगा उगारला.
पोलिस ठाणे भाग्यनगर
सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या तपासणीदरम्यान पूर्णा रोड, छत्रपती चौक येथे तीन इसम मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळले. त्यांच्यावर कलम 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेल, दारू दुकान व वाईन शॉपवर तपासणी करण्यात आली.
पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण
गोपाळची वाडी, एमआयडीसी व परिसरात दोन इसम दारू पिऊन गोंधळ करताना सापडले. त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिस ठाणे इतवारा
महाल रोड भागात दोन इसमांना मद्यधुंद अवस्थेत नागरिकांना त्रास देताना पकडण्यात आले. दोघांवर कलम 110/117 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस ठाणे विमानतळ
माला पेट्रोलपंप व गुंडेराव पेट्रोलपंप परिसरात चार इसम दारू पिऊन गोंधळ घालताना पकडले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून 2500 रुपये दंड आकारण्यात आला.
वजिराबाद पथक
वजिराबाद परिसरातील रिक्षाचालक, भाविक कोणीमाळ रोड येथे पाच इसम दारू पिऊन आरडाओरड करताना आढळले. त्यांच्यावर कलम 110/117 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. वाहन ट्रक चालक, मोबाईल बोलताना व दारूच्या नशेत असणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले की, “शहरात कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या शांततेत व्यत्यय आणणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.”
सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली.
हॉटेल, वाईन शॉप, दारू दुकान व पेट्रोलपंप परिसरात सखोल तपासणी करण्यात आली.
नांदेड पोलिसांकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर शिस्त राखण्यासाठी “सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक”ाची प्रभावी कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांत कायदा व सुव्यवस्थेबद्दलचा आत्मविश्वास वाढला असून, उपद्रवी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होत आहे.










