प्रतिनिधी, माधव वाघमारे
नांदेड, दि. ७ मार्च – नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ पथकाने गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध भागात छापे टाकून एकूण ९ इसमांवर कारवाई केली.
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार पथकप्रमुख सपोनि भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिनांक ५ आणि ६ मार्च रोजी शहरातील विमानतळ, भाग्यनगर, वजिराबाद, इतवारा आणि दामिनी पथकाच्या हद्दीत ही मोहीम राबवली.
ठिकठिकाणी कारवाईचा तपशील:
· विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत माळटेकडी ब्रिड़्ज, नामदार चौक येथे दोन इसम मद्यप्राशन करून शांतता भंग करताना आढळून आल्याने त्यांच्यावर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
· भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत जिरायत मैदान येथे दोन इसमांवर अशीच कारवाई करण्यात आली.
· वजिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत वजिराबाद मार्केट येथे एका इसमाला अटक करण्यात आली.
· इतवारा पोलीस स्टेशन हद्दीत जुना मोंढा येथे तीन इसम मद्यपान करताना सापडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
· दामिनी पथकाने विसावा गार्डन येथे आरडाओरड करून शांतता भंग करणाऱ्या एका इसमावर पोलीस स्टेशन विमानतळ येथे कारवाई केली.
याशिवाय या सर्व हद्दींमध्ये दारूची दुकाने, वाईन शॉप्स आणि हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, तसेच दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये. शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.












