नांदेड, दि. 11 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
अलीकडील काही दिवसांपासून “अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे” अशा प्रकारच्या निराधार अफवा सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून महामंडळाचे सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहे, असे स्पष्टीकरण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
देशमुख यांनी सांगितले की, जुलै 2025 पासून आजपर्यंत महामंडळामार्फत 34,783 ए.ओ.आय. निर्माण झाले असून 17,482 बँक प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. तसेच आतापर्यंत ₹270.29 कोटींची व्याज परतावा रक्कम लाभार्थ्यांना देण्यात आली आहे.
वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण सुरु
महामंडळाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता वाढविणे आणि लाभार्थ्यांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी वेब प्रणालीचे अपग्रेडेशन 10 ऑक्टोबर 2025 पासून सुरु आहे. यामध्ये –
- सुरक्षा ऑडिट पूर्ण करणे,
- लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सेवांचा कालमर्यादेत पुरवठा,
- एजंटमार्फत होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सीएससी केंद्रांमार्फत सेवा ₹70 मध्ये उपलब्ध करणे,
- लाभार्थ्यांसाठी मोबाईल ॲप विकसित करणे,
- नॅशनलाइज्ड बँकांबरोबर एपीआय इंटिग्रेशन,
- आणि “चॅट जीपीटी स्मार्ट बॉट” प्रणाली विकसित करणे यासारख्या नव्या सुविधा समाविष्ट आहेत.
🔹 फसवणूक रोखण्यासाठी कठोर पावले
राज्यात काही ठिकाणी एजंटमार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे आढळल्याने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांत फौजदारी गुन्हे नोंदवले गेले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रणालीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.
🔹 नवीन उपक्रम व प्रशिक्षण
महामंडळाकडून लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनारद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत. याशिवाय काही व्यवसायांमधून अपेक्षित रोजगारनिर्मिती होत नसल्याने त्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत पुनर्विचार होणार आहे.
तसेच आता लाभार्थ्यांना एकावेळी 6 व्याज परतावा क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे (पूर्वी 3 होती).
महामंडळ समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असून कोणत्याही राजकीय अथवा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.











