नांदेड, दि. 1 नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली “सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह” अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी धडक तपास मोहीम राबवली.
३० व ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रीच्या सत्रात शहरातील भाग्यनगर, नांदेड ग्रामीण, शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाने छापेमारी केली. यावेळी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे व शांतता भंग करणारे इसम आढळून आले. त्यांच्याविरुद्ध कलम 110/117 मुंबई पोलीस अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली.
पोलिस स्टेशन भाग्यनगर
नक्षत्र हॉल भगीरथ नगर जिरायत मैदान वर छापेमारी करून सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करणारे ४ इसम पकडले. सर्वांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण
ढवळे कॉर्नर परिसरात गस्त घालत असताना ४ इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळले. त्यांच्यावरही तत्काळ गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस स्टेशन शिवाजीनगर
दारू पिऊन गोंधळ घालणारे इसम आढळल्याने १ आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. परिसरातील दारू दुकानं, वाईन शॉप आणि हॉटेल्सची तपासणीही करण्यात आली.
पोलिस स्टेशन विमानतळ:
आनंदनगर परिसरात तपासणीदरम्यान १ इसम सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करताना आढळला. संबंधितांवर कलम 110/117 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
पथकाची धडक मोहीम
एकूण १७ इसमांवर कारवाई करताना दारू दुकानं, हॉटेल्स, वाईन शॉप्स व इतर ठिकाणांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत विशेष पथक अधिकारी व अमलदारांनी दक्षता दाखवली.
या कारवाईबाबत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की,
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना अजिबात सुट दिली जाणार नाही. नागरिकांनीही कायदा आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे,”
असे आवाहन त्यांनी केले.
नांदेड पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेला बळ मिळाले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












