नांदेड, दि. २ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या इसमांवर नांदेड पोलिसांनी सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत धडक कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलिस अधीक्षक श्री. सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विविध ठिकाणी रात्री ही कारवाई करण्यात आली.
ही मोहीम शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आली होती. शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी पेट्रोलिंग दरम्यान दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली.
पोलिस स्टेशन भाग्यनगर
महिला पोलिस अंमलदारांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत तिघे इसम लोहगड खंजर बाग भागात दारू पिऊन गोंधळ घालताना आढळले. त्यांच्यावर कलम ११०/११७ म.पो. कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेल व दारू दुकाने तपासण्यात आली.
पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण
येथील सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह पथकाने ढवळे कॉर्नर परिसरात कारवाई करून दोन इसमांना ताब्यात घेतले. शांतता भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिस स्टेशन इतवारा
इटवारा परिसरातील गल्ली, जुना मोंढा भागात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या तिघांवर कारवाई. कलम ११०/११७ म.पो. कायद्यानुसार गुन्हे दाखल.
पोलिस स्टेशन विमानतळ :
आनंद नगर भागात तिघे इसम दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करताना आढळले. तिघांवर कारवाई करून परिसरातील बार व हॉटेलची तपासणी करण्यात आली.
दामिनी पथक
वाहिनी पथकाने विष्णुपुरी व शंकरनगर परिसरात पेट्रोलिंग करताना शांतता भंग करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या संपूर्ण मोहिमेत शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले असून, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी सांगितले की, “नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, मद्यपान, बेकायदेशीर जमाव या बाबींवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. नागरिकांनी देखील अशा घटनांची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी.”












