नांदेड, दि. २८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना आता पोलिसांचा चांगलाच धडा मिळू लागला आहे. मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार आणि मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाने शहरात धडक कारवाई करून शांततेचा भंग करणाऱ्या अनेक इसमांवर कारवाई केली आहे.
ही कारवाई पथक प्रमुख सपोनी श्री. भागवत नागरगोजे व चार्ली पथकातील पोलिस अमलदार यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली.
भाग्यनगर पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई:
छत्रपती चौक, नक्षत्र मंगल कार्यालय येथे दोन इसम हे दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळले. त्यांच्यावर कलम ११० व ११७ महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच हद्दीतील दारू दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई:
पीव्हीआर मॉल परिसरात एक इसम दारू पिऊन गोंधळ घालताना सापडला. त्याच्यावर कलम ११० व ११७ म.पो.क. अंतर्गत कारवाई झाली. तसेच परिसरातील हॉटेल्स, बार आणि वाईन शॉपची तपासणीही करण्यात आली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई:
नवा मोंढा येथे दोन इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालताना मिळून आल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
विमानतळ पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई:
नमस्कार चौक रोडवर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनावर मोवाका अंतर्गत ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
दामिनी पथकाची कारवाई:
दामिनी पथकाने पेट्रोलिंग दरम्यान विसावा गार्डन व बर्फी चौक येथे चार इसम हे आरडाओरडा करून शांततेचा भंग करताना मिळून आले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ११० व ११७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन:
“नांदेड शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, तसेच अशा ठिकाणी दारू पिणाऱ्यांना प्रोत्साहन देऊ नये. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आवाहन मा. अबिनाश कुमार यांनी केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन केल्यास कारवाई अनिवार्य नांदेड पोलिसांची इशारा मोहीम सुरू!












