नांदेड 25 नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
न्यायालय परिसरात आज सकाळी झालेल्या वादग्रस्त घटनेने एकच खळबळ उडाली. खून प्रकरणातील आरोपीशी बोलत असताना त्याचा मुलगा फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करू लागला आणि यावरून त्याचा ड्युटीवरील पोलिसांसोबत वाद झाला. या प्रकरणी वजीराबाद पोलीस स्टेशन येथे संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना प्राप्त माहितीप्रमाणे, आज सकाळी न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खंडपीठात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याकडील नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या हद्दीतील विहिरी खून प्रकरणातील आरोपी मुंबई मारुती यांना तारखेवर हजर करण्यात आले होते. त्यावेळी आरोपीचा मुलगा मोहम्मद उमर हा त्यांना भेटण्यासाठी आला होता.
सुरुवातीला तो आपल्या वडिलांशी बोलत असताना सर्व काही सुरळीत होते. मात्र काही वेळाने त्याने न्यायालयीन परिसरातच वडिलांचे फोटो व व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. न्यायालय परिसरात कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण निषिद्ध असल्यामुळे ड्युटीवरील पोलिसांनी त्याला रोखले. यावरून मोहम्मद उमर याने पोलिसांशी वाद घालत गोंधळ निर्माण केला, अशी तक्रार पोलीस कर्मचारी एस.एन. बनसोडे यांनी नोंदवली आहे.
तक्रारीनुसार, वाद निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी वजीराबाद पोलिसांनी मोहम्मद उमर मोहम्मद मोहिमदिन मुंबई याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलमानुसार गुन्हा (क्र. 611/2025) दाखल केला आहे.
घटनास्थळी काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उपस्थित पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता प्रस्थापित केली. या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा मुलगा हा विधी शाखेचा विद्यार्थी असून त्याला न्यायालयीन शिस्त आणि मर्यादांविषयी समज दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.












