नांदेड – दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने मुस्लिम समाजाची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि पूर्णतः शांततेत पार पडली. याआधी श्रीगणेशोत्सव असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नांदेड पोलिस प्रशासनाने विशेष तयारी केली होती. दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस अधीक्षक मा.श्री. आबिनाश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मरकज मिलाद कमिटीचे पदाधिकारी व मुस्लिम धर्मगुरु यांची बैठक घेऊन मिरवणुकीच्या बाबतीत आवश्यक चर्चा करण्यात आली होती.
यानंतर ५ सप्टेंबर रोजी होणारी मिरवणूक दिनांक ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे आज सकाळी ९:४० वा. मुस्लिम समाजाची मिरवणूक निजाम कॉलनी येथून निघाली. पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेच्या व मार्गदर्शनाच्या उपस्थितीत मिरवणूक प्रमुख चौक-चौकातून जात शांततेत संपन्न झाली. मिरवणुकीत सुमारे २५ ते २७ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. विविध देखावे व वाहने यामध्ये सहभागी होती.
मिरवणुकीदरम्यान पोलीस अधीक्षक मा.श्री. आबिनाश कुमार यांनी निजाम कॉलनी येथे पुष्पहार घालून स्वागत केले. रेणुका माता मंदिराचे पदाधिकारी यांनी देखील प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. मुस्लिम समाजाकडून पोलीस प्रशासनाच्या नियोजनाबद्दल आणि सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या यशस्वी व शांततापूर्ण मिरवणुकीसाठी पोलीस अधीक्षक मा.श्री. अभिनाश कुमार यांनी मिरवणूक समितीचे पदाधिकारी, मुस्लिम धर्मगुरु व नागरिकांचे अभिनंदन केले आणि आभार मानले.












