नांदेड दि. 9 सप्टेंबर :- जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांसाठी कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखी आहे. ही स्पर्धा 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन 30 सप्टेंबरपर्यत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त, डॉ.राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
त्याअनुषंगाने 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सेक्टर स्किल कौन्सिल विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 जिल्हा, विभाग, राज्य, देशपातळीवरून प्रतिभासंपन्न कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेसाठी सर्व आयटीआयएस, पॉलिटेक्निक, एमएसएमई टुल्स रूम्स, सीआयपीईटी, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तंत्र संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबी व्हीईटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, ललित कला महाविद्यालये, फ्लॉवर प्रशिक्षण संस्था, ज्वेलरी मेकिंग संस्था, शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवेदन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी हेाण्यासाठी 50 क्षेत्रांकरीता उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. या क्षेत्राची माहिती https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.












