नांदेड, दि. 4 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त इ. 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नावनोंदणी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यासाठी सोमवार 15 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
फेब्रु मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखांना पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन मूळ अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे या तपशीलानुसार नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा (मुदतवाढ) सोमवार 1 ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. खाजगी विद्यार्थ्यांना इ. 10 वी व इ. 12 वीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा, भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत ), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.
पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. आवेदनपत्रे भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.










