मुदखेड (जि. नांदेड) –05/09/2025 दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी भारत फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी सतिश नारायणराव आहिले (वय २४) हे कामळज येथे वसुली करून देवापूरकडे जात असताना, कामळज–देवापूर रोडवर तीन अज्ञात आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून ५८,५२५ रुपये रोख रक्कम, एक सॅमसंग टॅब आणि बायोमेट्रिक डिव्हाइस जबरदस्तीने चोरले. याबाबत मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मा. श्री अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे:
- अजॉय राजू पोकरे (वय २१, रा. कामळज, ता. मुदखेड)
- आकाश मच्छिंद्र नवगीरे (वय १९, रा. आंबेडकरनगर, नांदेड)
- रोहित राहुल केळकर (वय २४, रा. श्रावस्ती नगर, नांदेड)
पोलिसांनी आरोपींकडून एकुण १,३५,५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ३३,५६० रुपये रोख, बजाज पल्सर मोटारसायकल (किंमत ९०,००० रुपये), आणि सॅमसंग टॅब (किंमत १२,००० रुपये) यांचा समावेश आहे. एका आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू असून अटक आरोपी एमसीआर मध्ये आहेत.
ही यशस्वी कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व तपास पथकाचे कौतुक केले आहे.












