नांदेड, दि. १२ सप्टेंबर – नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोटार सायकलवरून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एक आरोपीला अटक केली असून, एकूण १,६०,५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी खाजापूर येथील रस्त्यावरून अज्ञात इसमांनी एका इसमाला मारहाण करून ९१,३३२ रुपये रोख व मोटार सायकल काढून नेली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक नांदेड श्री. आबिनाश कुमार यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक नेमले. या पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती व सततच्या पाठपुराव्यानंतर संशयित आरोपी शेख अब्दुल रेहमान शेख इलियास (वय १९ वर्षे, देगलूर नाका ) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण १,३०,००० रुपयांची मोटार सायकल व ३०,५१० रुपये रोख रक्कम असा एकूण १,६०,५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक भानुदास चौरे, सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गवळ, पोलीस उपनिरीक्षक श्री. लहाने, श्री. गायकवाड, श्री. राठोड आणि त्यांच्या पथकाने केली.
पोलीस अधीक्षक नांदेड यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.












