प्रतिनिधी – माधव वाघमारे
नांदेड, दि. २ मार्च: नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने मालमत्तेचे नुकसान आणि शरीरावर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारी टोळीतील दोन सक्रिय सदस्यांना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आली असून, येत्या सहा महिन्यांपर्यंत या आरोपींना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी (निर्गमित क्रमांक ५९८/२०२६) काढला असून, सदर आदेशाची प्रत या दोघांना वैयक्तिकरित्या देण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेले आरोपी कोण?
१. अज्ञान बाबू बेले (वय ३२ वर्ष)
२. चंद्रकांत उर्फ चंदू बाबू बेले (वय २५ वर्ष)
दोन्ही आरोपी हे रा. गंगानगर, किनवट येथील रहिवासी असून, या टोळीतील हे दोघे सक्रिय सदस्य आहेत. यांच्यावर किनवट पोलीस स्टेशनमध्ये मालमत्तेचे नुकसान आणि शरीरावर हल्ला करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाईची पार्श्वभूमी
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून, अटकेनंतर जामीन मिळवून ते पुन्हा गुन्हेगारी कृत्यांना सुरुवात करीत होते. या आरोपींमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत होती. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही.
यामुळे त्यांना हद्दपार करण्यासाठी किनवट पोलीस ठाण्याचे वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते की, हे आरोपी सार्वजनिक शांतता भंग करून परिसरात दहशत निर्माण करीत आहेत.
‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत कारवाई सुरू
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या विरोधात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत गुन्हेगारांवर कारागृहात स्थानक बांधणे आणि हद्दपार करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई
हद्दपार आदेशानुसार, पुढील सहा महिन्यांपर्यंत हे दोन्ही आरोपी पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या पूर्वपरवानगीशिवाय नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत किंवा वावरू शकणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कारवाईतील सहभागी अधिकारी
या हद्दपार प्रस्तावाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले:
· मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड
· मा. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर
· मा. श्री. रामकृष्ण मळघणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट
प्रस्तावाचा पाठपुरावा किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश व्यंकटराव कराड आणि प्रतिबंधक पथकाने केला. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली आहे.












