नांदेड १८ मार्च (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्र फिरवत एका जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६८,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
फिर्यादी नरेश रंगनाथ पवार (वय ३४ वर्ष) हे १३ मार्च २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास आपल्या घराकडे जात होते. यावेळी दुधिया हनुमान मंदिर समोरील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी फिर्यादीच्या गळ्याला खंजीर लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडील ‘रेडमी’ कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता.
असा लागला छडा
या घटनेनंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. पोलिसांनी संशयावरून दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल मिळून आला.
आरोपींची नावे आणि जप्त मुद्देमाल
पोलिसांनी या प्रकरणात खालील आरोपींना अटक केली आहे:
१) खुदबुद्दीन पि. अन्वर काझी (वय २७ वर्ष, रा. मोमीनपुरा, इतवारा)
२) शेख सोहेल शेख याकुब (वय २२ वर्ष, रा. तेहरानगर, शिवाजीनगर)
जप्त केलेला मुद्देमाल:
- हिरो होंडा फॅशन प्रो मोटारसायकल (MH-26-U-2150) – किंमत ५०,०००/-
- रेडमी कंपनीचा मोबाईल – किंमत १०,०००/-
- विवो कंपनीचा मोबाईल – किंमत ८,०००/-
- गुन्ह्यात वापरलेला लोखंडी खंजीर – किंमत ३००/-
एकूण मुद्देमाल: ६८,३००/- रुपये.
तपासादरम्यान आरोपींनी नाना नानी पार्क परिसरातूनही एक मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सपोनि नाईक व त्यांच्या पथकाने केली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.












