नांदेड : २३ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत पोलिसांनी एका आरोपीस अटक करून तब्बल २२ चोरीच्या सायकली जप्त केल्या आहेत. या सायकलींची अंदाजे किंमत २ लाख ३७ हजार रुपये असून, या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा र. नं. ६६०/२०२५ कलम ३०३(२) BNS अन्वये तपास सुरू असताना, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१६ वाजता गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवली. या कारवाईत कल्याणनगर, नांदेड येथील राहणारा माधव गणपत मोरे (वय ४५) यास ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण २२ सायकली जप्त करण्यात आल्या. या सायकलींची एकूण किंमत अंदाजे २,३७,००० रुपये इतकी आहे. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील व मा. श्री. सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पो नि संतोष तांबे व अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्याकडून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.












