नांदेड |२६ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
मानाठा पोलिसांनी अवैध गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. डी. एस. ढोके यांच्या आदेशानुसार मानाठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विलास चवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुप्त माहितीनुसार मानाठा–बाराणा रोडवर अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन पिकअप वाहने थांबवली. तपासणीदरम्यान वाहनांमध्ये ८ गोवंश जनावरे निर्दयपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी दोन्ही वाहने व जनावरे ताब्यात घेतली.
या कारवाईत
- पिकअप वाहन क्र. MH-29 F 7384 (किंमत अंदाजे ५ लाख रुपये),
- पिकअप वाहन क्र. MH-28 BB 1282 (किंमत अंदाजे ५ लाख रुपये),
- ८ गोवंश जनावरे (किंमत अंदाजे ३ लाख २० हजार रुपये)
असा एकूण १३,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मानाठा पोलीस ठाण्यात गु. र. नं. २३०/२०२५ अन्वये महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांवरील छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू असून जप्त करण्यात आलेली गोवंश जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत.
बेकायदेशीर जनावर वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचा इशारा देत पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी मानाठा पोलिस पथकाच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.












