नांदेड : 25 सप्टेंबर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेड तालुक्यातील नांदूसा शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली.
या पाहणीवेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोढारकर, आमदार बाबुराव कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कार्डीले, व नांदेड तहसीलदार संजय वारकड व विविध विभागांचे अधिकारी तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिलासा देताना मंत्री राठोड म्हणाले, “शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. बाधित शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल. शासन पातळीवर सातत्याने प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.”
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत आश्वासन दिले की, नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवून मदतीसाठी तातडीने पावले उचलली जातील.
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी पिक विमा रकम तसेच नुकसानीची मदत वाढवून मिळावी, अशी मागणी मंत्र्यांकडे केली.
👉 अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत देण्याचे आश्वासन देत मंत्री राठोड यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.












