नांदेड दि. 2 ऑक्टोबर – नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तसेच दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक नांदेड मा. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार “सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह” अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी गस्त घालून तपासणी केली. या कारवाईत अनेकांना दारू पिऊन गोंधळ घालताना तसेच दारूचे सेवन करून शांतता भंग करताना रंगेहात पकडण्यात आले.
प्रमुख कारवाया :
- पोलिस स्टेशन भाग्यनगर – पेट्रोलिंग दरम्यान सम्राट चौक येथे काही इसम दारू पिऊन बसलेले व शांतता भंग करताना आढळले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
- पोलिस स्टेशन विमानतळ – शोभानगर येथे 3 इसम दारू पिऊन गोंधळ घालताना पकडले गेले. त्यांच्यावर कारवाई करून 68 प्रमाणे गुन्हे दाखल झाले.
- पोलिस स्टेशन इतवारा – जुन्या मोंढा परिसरात दारू पिऊन बसलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल.
- पोलिस स्टेशन शिवाजीनगर – कुसुमताई चौक येथे 3 इसम दारू पिऊन शांतता भंग करताना पकडले गेले.
- पोलिस स्टेशन नांदेड ग्रामीण – ढवळे कॉर्नर येथे 2 इसम दारू पिऊन गोंधळ घालताना पकडले गेले.
- दामिनी पथक – बाबानगर येथील विशाल गार्डन परिसरात 5 इसम दारू पिऊन बसलेले आढळून आले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या सर्व कारवायांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68 तसेच शांतता भंगाच्या संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, शहरात कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे किंवा त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे सहन केले जाणार नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.












