नांदेड | २८ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका सराईत गुन्हेगारावर पुन्हा एकदा हद्दपारची कारवाई करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्रमांक १२३३/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास बळीरामपूर, नांदेड येथे गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित इसम हा हद्दपार आदेशाचा भंग करून नांदेड जिल्ह्यात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला.
आरोपीचे नाव संघर्ष सुनील पचडे (वय २५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. बळीरामपूर, ता. जि. नांदेड) असे आहे. सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होत होता. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी, नांदेड यांनी आदेश क्रमांक २०२५/हद्दपार/फौज/सा.आ. – २७/२०२५ अन्वये त्याला जिल्हाबाहेर हद्दपार केले होते.
मात्र, आरोपीने सदर आदेशाचा भंग केल्याने नांदेड ग्रामीण पोलिसांनी पुन्हा कठोर भूमिका घेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील वअप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.












