नांदेड, दि. ३ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड तालुक्यातील बिलोली पंचायत समिती कार्यालयात आज सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक अधिकारी, कर्मचारी व शिपाई अनुपस्थित असल्याचे चित्र दिसून आले. कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी असून, विविध कामांसाठी आलेले ग्रामस्थ तासन्तास रांगेत उभे राहून त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे घरकुल योजनेच्या विभागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून, संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याने अर्जांची पडताळणी, मंजुरी व निधी वितरणाची कामे ठप्प झाली आहेत. अनेक ग्रामस्थांनी सांगितले की, “आम्ही अनेक वेळा ये-जा करतो, पण अधिकारी कधीच वेळेवर बसत नाहीत. प्रत्येक वेळी ‘उद्या या’ असे सांगून आम्हाला परत पाठवले जाते.”
यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काहींनी तर म्हटले की, आम्ही शेतमजूर लोक, रोजंदारी सोडून ऑफिसात येतो. पण इथे अधिकारी नाहीत, कर्मचारी नाहीत. आमचे काम कोण करणार
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने या गैरहजेरीची दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण विकास विभागाच्या महत्त्वाच्या योजनांवर परिणाम होत असल्याने, ग्रामस्थांचे हक्काचे लाभ वेळेत मिळत नाहीत.
दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने शिस्त बिघडली आहे. काही जण रोज उशिरा येतात किंवा सुट्टीवर जातात, पण कोणी विचारणा करत नाही.”
पंचायत समितीतील या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागातील विकासकामे आणि नागरिक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत.











