नांदेड: २२ मार्च
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध पुकारलेली मोहीम अधिक तीव्र झाली आहे. या मोहिमेच्या पाचव्या दिवशी परिक्षेत्रातील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून, यामध्ये ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ८ लाख ४२ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून नागरिकांचा बचाव व्हावा, या सामाजिक उद्देशाने ही विशेष मोहीम १६ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान राबविण्यात येत आहे.
पाच पोलीस ठाण्यांतर्गत धडक कारवाई
या मोहिमेअंतर्गत परिक्षेत्रातील खालील ठिकाणी छापे टाकण्यात आले:
१. भाग्यनगर (नांदेड)
२. मुखेड (नांदेड)
३. बोरी (परभणी)
४. उदगीर ग्रामीण (लातूर)
५. औंढा नागनाथ (हिंगोली)
या पाचही ठिकाणी गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम १२३ अंतर्गत एकूण ५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कडक शिक्षेची तरतूद
या मोहिमेमध्ये केवळ गुटखाच नव्हे, तर सुगंधी तंबाखू, भेसळयुक्त चघळण्याची तंबाखू, सुगंधी सुपारी, पान मसाला, खर्रा आणि मावा यांसारख्या पदार्थांवरही कारवाई केली जात आहे. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कलम १२३ बी.एन.एस. अंतर्गत चालणारे हे खटले सत्र न्यायालयात चालवले जातात. यामध्ये दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि द्रव्यदंडाची तरतूद असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
‘खबर’ हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन
अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा ‘खबर’ हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. नागरिक आपल्या भागातील अवैध गुटखा विक्री किंवा वाहतुकीबाबत या क्रमांकावर फोन करून अथवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.
बातमी लेखन: प्रतिनिधी माधव वाघमारे











