नांदेड: १८ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
शहरात वाढत्या नशिल्या पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाग्यनगर गुन्हे शोध पथक आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त रस्ता राबवत भाग्यनगर परिसरातील एका मेडिकल स्टोअरवर छापा टाकून तब्बल ७०,४०० रुपये किमतीच्या प्रतिबंधित ‘प्रेगाबालिन’ (Pregabalin) कॅप्सूल जप्त केल्या आहेत.
बनावट गिऱ्हाईक पाठवून केला पर्दाफाश
नांदेड शहरातील काही मेडिकल चालक कॉलेजमधील तरुण मुले आणि गुन्हेगारांना विना-प्रिस्क्रिप्शन नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या विकत असल्याची गोपनीय माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांनी एका बनावट गिऱ्हाईकाला ५०० रुपये देऊन राजकॉर्नर भागातील ‘जय हनुमान फार्मा’ येथे पाठवले. तिथे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी १० गोळ्या २५० रुपयांना देण्यात आल्या. व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले.
१६०० कॅप्सूल आणि विनापरवाना साठा
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री. अ. तु. राठोड व त्यांच्या पथकाने मेडिकलची तपासणी केली असता, तिथे १६०० प्रेगाबालिन कॅप्सूल आढळून आल्या. या औषधांच्या खरेदीबाबत मेडिकल चालकाकडे कोणतीही वैध कागदपत्रे किंवा बिल उपलब्ध नव्हते. हे औषध नशेसाठी बेकायदेशीररीत्या विकले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, विशाल माळवे, गजानन किडे, विष्णू मुंडे आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
पोलिसांचे आवाहन: > कोणत्याही मेडिकल चालकाने डॉक्टरांच्या अधिकृत प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीकारक किंवा नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करू नये. अशा अवैध विक्रीवर पोलिसांची करडी नजर असून भविष्यातही कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.












