नांदेड, 15 नोव्हेंबर —(प्रतिनिधी) माधव वाघमारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी (एसएससी) परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्रांसाठी विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्याच्या तारखांना अंतिम मुदतवाढ दिली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार —
- विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत: 11 ते 17 नोव्हेंबर 2025
- RTGS/NEFT द्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी: 11 ते 18 नोव्हेंबर 2025
- शाळांनी पावत्या, चलने व प्रिलिस्ट विभागीय मंडळात जमा करण्याची अंतिम तारीख: 19 नोव्हेंबर 2025
राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE+ मधील PEN-ID वरून शाळांमार्फत ऑनलाईन भरायची आहेत. तर पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजना, तुरळक विषय तसेच ITI ‘Transfer of Credit’ घेणारे विद्यार्थी यांनी आपली अर्ज mahahsscboard.in वरून प्रचलित पद्धतीने ऑनलाइन भरावेत.
शाळांनी आवेदनपत्र भरण्यापूर्वी School Profile मधील सर्व माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. सबमिट झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या Pre-list ची विद्यार्थ्यांकडून व मुख्याध्यापकांकडून स्वाक्षरीसह पडताळणी करणे आवश्यक आहे.
शुल्क भरण्यासाठी मंडळाने दिलेल्या ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये केवळ RTGS/NEFT व्यवहार मान्य आहेत. रोख शुल्क स्वीकारले जाणार नाही. चलनानुसार शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अर्जाचा Status: Draft → Send to Board आणि Payment: Not Paid → Paid असा बदल झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज मंडळाकडे गृहित धरले जाणार नाहीत.
मंडळाने स्पष्ट केले आहे की सादर केलेल्या अर्जांचे शुल्क भरल्याशिवाय प्रवेशपत्रे उपलब्ध होणार नाहीत तसेच विलंब शुल्काच्या तारखांना पुन्हा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
राज्य मंडळाचे सचिव यांनी सर्व शाळांनी ही माहिती नोंद घेऊन वेळेत कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.












