नांदेड, दि. 20 ऑक्टोबर (प्रतिनिधी) :- सावरी (ता. किनवट) येथील रहिवासी राजरत्न विष्णु वाठोरे यांनी स्वतःवर झालेल्या जातीय छळ, धमक्या आणि पोलिसांकडून होत नसलेल्या कारवाईविरोधात आत्मदहन करण्याची परवानगी मागणारे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
बाठे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 28 सप्टेंबर 2025 रोजी ते गावातील हनुमान मंदिराजवळ गेले असता काही व्यक्तींनी त्यांच्या जातीवरून अपमानास्पद शब्द वापरत शिवीगाळ केली, तसेच मारहाण व जीव घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी FIR क्र. 0289/2025 नोंद असूनही संबंधित आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
बाठे यांनी आपल्या निवेदनात पुढे नमूद केले की, आरोपींकडून त्यांच्यावर उलट खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. “केस मागे घेतली नाही तर ४ ते १० लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा माझ्यावर उलट गुन्हे दाखल करून अडचणीत आणू,” अशा धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “गावातील काही समाजविरोधी प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या जातीविषयी द्वेषपूर्ण वातावरण निर्माण केले आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही योग्य कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही असुरक्षित आहोत. आमच्यावर अन्याय होऊन आम्ही व आमचा परिवार धोक्यात आहे.”
राजरत्न बाठे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर आरोपींना तत्काळ अटक करून न्याय मिळाला नाही, तर आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागेल. आमच्यासह संपूर्ण सावरी गावातील एससी समाजातील लोक यातून तीव्र रोषात आहेत.”
शेवटी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना विनंती केली आहे की, FIR क्र. 0289/2025 मधील आरोपींना तात्काळ अटक करून, संबंधित तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करावा. अन्यथा न्याय न मिळाल्यास ते व त्यांच्या समाजातील इतर लोक आत्मदहनाचा मार्ग स्वीकारतील, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.












