नांदेड, दि. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी):
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली सिटी रूट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलिस दलाने विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या मोहिमेचा उद्देश शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन, गोंधळ आणि गुन्हेगारी प्रकारांना आळा घालणे हा आहे.
या कारवाईत नांदेड शहरातील विविध पोलिस ठाण्यांनी आपापल्या हद्दीतील तपासणी मोहिमा राबवून अनेकांना ताब्यात घेतले. ही तपासणी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आली.
🔹 पोलिस स्टेशन नांदेड शहर
सिटी रूट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलिस अमलदार यांनी तीन ठिकाणी छापे टाकले. दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कलम ११०/११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच हॉटेल, दारू दुकाने आणि वाईन शॉपची तपासणी करण्यात आली.
🔹 पोलिस स्टेशन विमानतळ
या हद्दीत दोन ठिकाणी तपासणी करून एका इसमावर कारवाई करण्यात आली. संबंधित व्यक्ती सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचवत असल्याचे आढळून आले.
🔹 पोलिस स्टेशन शिवाजीनगर
येथील पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई केली. दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कलम ११०/११७ अन्वये गुन्हे दाखल झाले.
🔹 पोलिस स्टेशन इतवारा
या विभागात जुना मोंढा परिसरात एका इसमावर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान दारू सेवन करून शांतता भंग करणारा आढळला. त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी सुरू आहे.
🔹 पोलिस स्टेशन भाग्यनगर
येथील पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. दारू सेवन करून शांतता भंग करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
🔹 दामिनी पथकाची भूमिका
दामिनी पथकानेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. पेट्रोलिंगदरम्यान संशयितांची तपासणी करून एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक अभिनव कुमार यांनी सांगितले की, “शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून गोंधळ माजवू नये. अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
नांदेड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याला द्यावी, जेणेकरून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवली जाऊ शकेल.












