नांदेड दि. १ ऑक्टोबर :
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील सिडको येथे घडलेल्या खुनाच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश (एक), नांदेड यांच्या न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची व प्रत्येकी ५,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर घटना अशी की, सिडको येथील नरेंद्र पांडुरंग सूर्यवंशी यांना २०२३ साली तीन भावांनी – सत्येंद्र पांडुरंग सूर्यवंशी, सुरेंद्र पांडुरंग सूर्यवंशी व राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (रा. सिडको, नांदेड) यांनी दारूच्या नशेत वाद घालून मारहाण केली. या मारहाणीमध्ये नरेंद्र सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 702/2023 भादंवि कलम 302, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिगंबर जामलवकर यांनी काटेकोरपणे करून आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षाचे वकील श्री. रणजीत देशमुख यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यानुसार माननीय न्यायालयाने आरोपींना जन्मठेप व ५,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल श्री. पांचाळ यांनी कामकाज पाहिले. संपूर्ण कारवाईवर पोलीस अधीक्षक नांदेड मा. अबिनाश कुमार यांनी विशेष लक्ष ठेवले. त्यांनी तपास अधिकारी, पेरवी अधिकारी व संपूर्ण पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे.
👉 या प्रकरणामुळे गुन्ह्यांमध्ये आरोपींना तात्काळ अटक, भक्कम पुरावे गोळा करणे व न्यायालयीन प्रक्रियेत दक्षता घेणे याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.












