नांदेड, दि. २८ सप्टेंबर :
नांदेड तालुक्यातील भालकी परिसरात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदी आणि आसपासच्या नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे मौजे भालकी शिवारातील शेतांमधील आखाड्यावर तब्बल २४ नागरिक अडकून पडले. त्यामध्ये ३ लहान मुले, ८ महिला आणि १३ पुरुषांचा समावेश होता.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत एसडीआरएफ (State Disaster Response Force) पथकाला संपर्क साधला. दोन बोटींसह घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी आमदार बालाजी कल्याणकरही घटनास्थळी उपस्थित होते.
बचावकार्य संपल्यानंतर सर्व नागरिकांना सुरक्षित निवारा केंद्रावर हलविण्यात आले. प्रशासनाच्यावतीने त्यांच्यासाठी जेवण व झोपण्याची सोय करण्यात आली.
या धाडसी मोहिमेत एसडीआरएफ पथकासोबत मंडळ अधिकारी तरोडा शिवानंद स्वामी, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, तलाठी गोपीनाथ कल्याणकर, अविनाश करंदीकर, कृषी सहाय्यक वसंत जारिकोटे, सरपंच प्रभाकर शेजुळे (चिखली बुद्रुक), सरपंच राजू धाडवे (भालकी), गणेश धाडवे, लक्ष्मण कल्याणकर यांच्यासह ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.












