नांदेड |२५ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
पुणे शहरात घडलेल्या खून प्रकरणात फरार झालेले दोन आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील अंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत नातेवाईक जावेद पठाण यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पुणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६५/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून करून आरोपी पुणे शहरातून फरार झाले होते.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी नांदेड ग्रामीण भागात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष गुन्हे शोध पथक गठीत करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, अंमलदार अर्जुन मुंडे, शेख सतार, समीर अहमद, गवेद्र सिरमलवार व शंकर माळगे यांनी तांत्रिक माहिती व बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.
अखेर सापळा रचून नांदेड ग्रामीण हद्दीतून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे १) संदीप रंगराव भुर्के (वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. चिखलवाडी, ता. भोकर, जि. नांदेड) आणि २) ओंप्रकाश गणेश किरण (वय २४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. चिखलवाडी, ता. भोकर, जि. नांदेड) अशी आहेत.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी पुणे शहरातील अंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले असून, गुन्हेगारीवर कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.












