नांदेड, २८ सप्टेंबर :
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज (२८ सप्टेंबर २०२५) दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यात २८ व ३० सप्टेंबर तसेच १ व २ ऑक्टोबर या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज (२८ सप्टेंबर) तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर ३० सप्टेंबर, १ व २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जिल्ह्यातील नागरिक व संबंधित यंत्रणांनी पूर्ण खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी करावयाच्या काळजीच्या उपाययोजना:
१) विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. बाल्कनी, छत किंवा घराबाहेर थांबू नका.
३) घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा.
४) विजेचे खांब, तारांचे कुंपण व लोखंडी वस्तूं पासून दूर रहा.
५) पाण्यात उभे असाल तर लगेच पाण्यातून बाहेर पडा.
करू नयेत अशा धोकादायक गोष्टी:
१) विजा चमकत असताना लँडलाईन फोन, शॉवर, नळ, पाईपलाइन व विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
२) वादळी वाऱ्यात लोखंडी शेड किंवा तंबूमध्ये आसरा घेऊ नका.
३) उंच झाडाखाली थांबू नका.
४) धातूंच्या मनोऱ्याजवळ उभे राहू नका.
५) घरात असताना खिडकीतून किंवा उघड्या दारातून वीज पडताना पाहू नका.
👉 हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून, सावधानता बाळगल्यास जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.












